पाटणा : बिहारमधून सध्या रोज एक नवी अपडेट येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडीया आघाडीतून बाहेर येताच भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. आता ते जवळपास निश्चित झाले आहे. उद्या (रविवारी २८ तारखेला) भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ ते घेऊ शकतात. त्यामुळे नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे.
नितीश कुमार भाजपसोबत गेल्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता नितीश कुमार भाजपसोबत गेले तर इंडिया आघाडीला मोठे खिंडार पडू शकते. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार यांची भाजपसोबत बोलणी सुरु केली होती. भाजप वरिष्ठांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांना मंजुरी दिल्याचे समजत आहे.
२०१७ मध्ये नितीश कुमार भाजपसोबत गेले होते. २०२२ मध्ये नितीश यांनी पुन्हा लालू यादव यांच्या आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते परत भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे त्यांची ‘पलटू कुमार’ अशी प्रतिमा बनली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून कमी जागा मिळत असल्याने त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जातेय.