लोणी काळभोर : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचे अपहरण आणि त्यानंतर हत्या करून मृतदेह शिंदवणे (ता. हवेली) घाटात फेकून दिल्याची घटना 9 डिसेंबरला घडली होती. ही हत्या 5 लाख रुपयांची खंडणी देऊन झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. या घटनेने पुणे शहरासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी रोज नव-नविन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आपल्या नवऱ्याला संपवण्याची सुपारी दिली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीलाही बुधवारी अटक केली आहे. पोलिसांनी वाघ यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. मोहिनी सतीश वाघ ( वय 50) असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.
यापूर्वी पोलिसांनी पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30, रा. फ्लॅट नंबर 201 लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 31, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28, रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय 29, रा. फ्लॅट नंबर 305 विघ्नहर्ता सोसायटी, सामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) व अतिश जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
प्रेम प्रकरणातून हत्या
दरम्यान, सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, हत्येचं नेमकं कारण समोर आलं नव्हत. आता हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.