पुणे: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाअधिवेशन घेण्याची तयारी चालवली आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सर्व विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हे अधिवेशन घेण्याचे निश्चित झाले आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनासाठी राज्यातून भाजपचे २५ ते ३० हजार पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन आहे.
राज्यातील २८ महापालिका, शेकडो नगर पंचायत/परिषदांसह २६ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. आता महायुतीला खास करून भाजपला अविश्वसनीय यश मिळाल्यानंतर येत्या तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्रलंबित निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. मार्च- एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.