नाशिक : विधानसभेसाठी झालेल्या मतदानात भाजपचे काही माजी नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करून विरोधी उमेदवारांना उघडपणे मदत करीत प्रचारात देखील सक्रिय सहभाग नोंदवला. अशा काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची प्रदेश भाजपकडून दखल घेत त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. तथापि, हकालपट्टी झालेल्यांव्यतिरिक्त इतरही काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी पुढे आल्याने संबंधितांवर पक्षकारवाई कधी होणार, असा प्रश्न भाजपमधील एकनिष्ठांनी उपस्थित केला आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले होते. त्याचबरोबर मोदी लाटेमध्ये महापालिकेत कधी नव्हे ते भाजपचे जवळपास ६५ नगरसेवक विजयी झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक सदस्य संख्या निवडून आणणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला. पक्षात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षातून अनेकांनी प्रवेश केल्याने भाजपमध्ये एकप्रकारे भरतीच आली.
कालांतराने यातीलच अनेकांना पक्षाकडून मोठमोठी पदे, तसेच जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आल्याने त्यातून पक्षातील निष्ठावान दुखावले गेले. म्हणून त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ भाजपकडे बघण्याचा पक्षातीलच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. २०१९ ची निवडणूक आणि त्यानंतर आताही विधानसभा निवडणुकीत पक्षात बाहेरून आलेल्या अनेकांनी बंडखोरी केली, तर काहींनी पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचारात उघडपणे सहभाग घेतल्याच्या तक्रारी प्रदेश पातळीवर करण्यात आल्या.
विरोधकांचा प्रचार करूनही त्याविरोधात काहीच पावले उचलली नाहीत, तर त्यातून वेगळा संदेश जाऊ नये म्हणून प्रदेश भाजपने गेल्या आठवड्यात जवळपास १७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतरही इतर अनेकांनी २०२४ निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याने त्यांना पक्षात थारा देऊ नये, असे एकनिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्याकरिता एकनिष्ठ पदाधिकारी आक्रमक झाल्याचे समजते. यासंदर्भात समाजमाध्यमांवर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. पूर्व विधानसभा मतमदारसंघात भाजपच्या विरोधी उमेदवारासाठी काही माजी नगरसेवकांनी प्रचार केला, तर दुसरीकडे पश्चिम विधानसभा मतदारसंघातही पक्षविरोधी काम केल्याच्या घटना घडल्याने संबंधितांची हकालपट्टी पक्षाकडून करण्यात आली आहे.
पक्षातून काढणारे तुम्ही कोण?
प्रदेश नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित केले म्हणजे पाहिजे ती पदे मिळतात व पाहिजे तसे सोयीचे राजकारण करता येते, अशा स्वरूपाचा भ्रम इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांचा झाला आहे. त्यामुळे पक्षाचे नाव खराब होत असून, यापुढे अशा चुकीच्या प्रथांना प्रखर विरोध केला जाईल, असा थेट इशारा एकनिष्ठ व निष्ठावानांनी दिला आहे. भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्यांपैकी काही माजी नगरसेवक व पदाधिकारी मात्र, तुम्ही आम्हाला पक्षातून काढणारे कोण, आम्ही ज्या भाजपच्या एकमेव नेत्याला मानतो, त्या नेत्याचे आम्ही ऐकणार, अशा स्वरूपाची भाषा करीत असल्याने पक्ष मोठा की व्यक्ती मोठी असा प्रश्न निष्ठावानांनी उपस्थित केला आहे.