पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती आणि विचारांवर प्रभावित होऊन समाजकार्यासाठी एखाद्या पक्षातील चांगले कार्यकर्ते पक्षात येत असतील, तर त्यांचे निश्चितच स्वागत आहे. कोणालाही त्रास देऊन पक्षात घेतले जात नाही. अद्याप महानगरपालिका निवडणुकांना वेळ आहे. त्यामुळे मनपा निवडणूक स्वबळावर लढवायच्या की नाहीत, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, जागा जिंकणे किंवा जागा लढणे यात फरक असतो. हे सर्व नगरसेवक विद्यमान आहेत. बाकीचे तुम्ही समजून घ्या, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपमधून उमेदवारी देण्याचे संकेत दिले.
पुण्यातील ठाकरे गटाचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वेगाने प्रगती होत आहे. जगभरात भारताला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपली आहे. मोदींच्या कार्यपद्धतीमुळे देशभरातून इतर पक्षातील लोक भाजपमध्ये येत असतात. पुण्यात शिवसेनेचे काही नगरसेवक पक्षात येत आहेत. समाजकार्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी पक्षात येत असतील त्यांचे स्वागत करायला हवे.
पालकमंत्री पदावर बोलताना मोहोळ म्हणाले, पुण्याच्या पालकमंत्री पदावरून कुठलाही बाद नाही, विधानसभा निवडणूक ही एकदिलाने आणि महायुती म्हणून आम्ही लढलो. आमच्या कार्यकत्यांमध्ये समज आणि समन्वय आहे. पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. राज्यात काही ठिकाणी मराठी माणसांबर होणाऱ्या हल्ल्यातून निर्माण झालेला मराठी अस्मितेचा प्रश्न ही गंभीर बाब असून याची मुख्यमंत्र्यानी दखल घेतली आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळत आहेत.