नवी दिल्ली: दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कालकाजीमधील रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवू, असे वक्तव्य बिधुडी यांनी केले. काँग्रेसने यावर संताप व्यक्त करत भाजप हा महिलांविरोधी पक्ष असल्याची टीका केली.
बिधुडी यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये बिधुडी म्हणतात की, लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, लालू आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो की, कालकाजी मतदारसंघातील सर्व रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालाप्रमाणे बनवेन. बिधुडी यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावरून बिधुडी आणि भाजपवर सडकून टीका केली.
भाजप हा महिलांविरोधी पक्ष आहे. रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यातून महिलांबाबतची त्यांची कुत्सित मानसिकता दिसते. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली. बिधुडी यांच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
बिधुडींची सारवासारव अन् दिलगिरी
टीकेनंतर बिधुडी यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याची सारवासारव केली. तसेच दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी काँग्रेसला आक्षेप असेल तर त्यांनी आधी लालू लालू यादव यांना हेमा मालिनी यांची माफी मागण्यास सांगावे, असेही बिधुडी म्हणाले. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. कालकाजी मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात रमेश बिधुडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.