पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. तसेच सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. नुकतीच भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अशातच आता माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. निलेश राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतल्यास वैभव नाईक आणि निलेश राणे कुडाळमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 पैकी 2 विधानसभा भाजप, तर एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचेही चित्र आहे. भाजपच्या दोन जागांपैकी कणकवलीच्या जागेवर नितेश राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, निलेश राणे हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ-मालवणमधून लढण्यास इच्छुक आहेत. महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्यास निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.