पुणे : राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने पॅटर्न बदलत रेखा गुप्ता यांचं नाव निश्चित केल आहे.मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (20 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर दुपारी 12.35 वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी 30000 हून अधिक लोक सहभागी होणार आहेत. विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहेत.

आरएसएसने एका महिलेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा प्रस्ताव भाजपला दिला होता.. संघाने रेखा गुप्ता यांचं नाव पुढे केलं असून भाजपने ते मान्य केलं.. त्यामुळे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांचं नाव निश्चित झाल आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पक्षाने 15 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 9 नावे निवडण्यात आली आहेत. या 9 नावांपैकी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका ही समोर आली आहे.या सोहळ्यासाठी आपचे प्रमुख दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अतिशी यांनाही आमंत्रित करण्यात आला आहे.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगपती, सिनेतारक, क्रिकेटपटू, संत, मुत्सद्दीही येणार आहेत. दिल्लीतूनही 12 ते 16 हजार लोकांना बोलावण्यात आले आहे. दिल्लीत या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.








