पुणे : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सूरज चव्हाण याला महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉस जिंकल्यानंतर बारामतीकर सूरज चव्हाणला अजित पवार यांनी घर बांधून देण्याची घोषणा केली. यानुसार, सध्या सूरज चव्हाणच्या घराचं काम जोरदार सुरु आहे. या कामामध्ये सूरज चव्हाण स्वत:ही मेहनत करताना दिसत आहे. त्याच्या घराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सूरजने त्याच्या घराच्या बांधकामाचा व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये तो फावडा आणि सिमेंट हातात घेऊन काम करताना दिसतोय. तसेच घराच्या कच्च्या भिंतींना पाणी देताना दिसतोय. “माझ घर. लवकरच बिग बॉसचा बंगला”, असे कॅप्शन देत सूरजने घराच्या बांधकामाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व स्तरातून सूरजचं कौतुक होत आहे. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतरही सूरजचे पाय अजून जमिनीवरच आहेत, असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. “ज्याला कष्टाची लाज नाही तो व्यक्ति आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही “, “ज्याला दुनिया हसली, त्याने दुनियेला रडवल आणि हसायला शिकवलं! लढ भावा”, “शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा सूरज दादा ” अशा अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
दरम्यान, सुरजने हालाकीच्या परिस्थितीतून वर येत स्वतःच वेगळं असं छान विश्व तयार केलं. कोरोनाच्या काळात टिकटॉकच्या माध्यमातून सुरज प्रसिद्धीच्या झोतात आला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर मी स्वतःचे घर बांधेन असे बरेचदा तो म्हणालेला. त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकारही घेतला. आता त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होताना दिसून येत आहे.