लोणी काळभोर : थेऊर येथे जय मल्हार हॉटेल जवळ लघुशंका का केली असे विचारल्याच्या रागातून ६ ते ७ इसमांनी सुरक्षारक्षक व त्यांच्या पत्नीस हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केले होते, तसेच त्यातील एकाने गोळीबार करत त्या दांपत्याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. यामध्ये शितल चव्हाण जखमी झाल्या होत्या नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या घटनेतील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती, तर अन्य फरारी गुन्हेगारांचा पोलीस शोध घेते होते. अखेर फरारी गुन्हेगारांपैकी दोघांना खेड शिवापूर येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
थेऊर येथील घटना घडल्यानंतर गुन्हेगार पळून जात असताना युनिट ६ च्या पथकाने ०३ गुन्हेगारांना लोणीकंद येथील थेऊरफाट्यावर ताब्यात घेतले होते, परंतू इतर गुन्हेगारांचा गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता. या घटनेतील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर(दि. १ जानेवारी २०२५) गुन्हेगारांवर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहन चोरी पथक १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बिडवई, युनिट ६ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, दरोडा व वाहन चोरी पथक २ असे गेल्या ३ दिवसापासून गुन्हेगारांचा त्यांचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार खेड शिवापूर येथून गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मयूर शंकर जाधव (वय ३२ वर्षे रा. मु.पो. कुरुळी, बांदल वस्ती, दत्त मंदिराच्या बाजूला ता. खेड जिल्हा पुणे), प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३ वर्षे, रा केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, राधाकृष्ण मंदिराजवळ ता. खेड, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येत आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक बिडवई, गुन्हे शाखा युनिट ६चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ व २ कडील सहा. पोलीस फौजदार दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार, गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, महेश पाटील, संदीप येळे, विनायक येवले, समिर पिलाणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.