पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (उबाठा) ५ माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून त्यात नेत्यांनी पुण्यातील संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार केली आहे. पल्लवी जावळे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवकही मुंबईत फडणवीस यांची भेट घेताना उपस्थित होते.
त्याशिवाय माजी नगरसेविका प्राची आल्हाट आणि संगीता ठोसर यांचे पती देखील उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत ही भेट झाली. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पुण्यातच जाहीर कार्यक्रमात प्रवेश करून घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची पुण्यातील राजकीय स्थिती गंभीर झाली आहे. आणखी दोन नगरसेवक त्याचदिवशी प्रवेश करतील असे सांगण्यात आले आहे. विसर्जीत महापालिकेत (२०१७-२०२२) एकत्रित शिवसेनेचे १० नगरसेवक होते. त्यातील नाना भानगिरे यांनी आधीच शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता उर्वरित शिवसेनेतील तब्बल ५ नगरसेवक भाजपत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, श्वेता चव्हाण हे तीनच नगरसेवक आता शिवसेनेत राहिले आहेत.
याबाबत बोलताना धनवडे म्हणाले कि, जो पक्ष वाढवण्यासाठी अविरत कष्ट घेतले, ज्याचे काम इतकी वर्ष निष्ठेने केले, तो पक्ष सोडताना कोणाबद्दलही कसली तक्रारी नाही. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षालाच पुण्यात त्यांचे अस्तित्व नको आहे. नेते काही लक्ष द्यायलाच तयार नाहीत, लोकसभा नाही, विधानसभा नाही अशी पक्षाची अवस्था झालेली असूनही संघटना बांधणी, पक्ष वाढ या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ नेत्यांना याबाबत वारंवार कळवूनही त्यांनी कधीच ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळेच या निर्णयाप्रत आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.