कल्याण : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यात एकच संतापाची लाट आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशातच आता बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या असून पोलिसांनी हा संपूर्ण तपास असंवेदनशील पद्धतीने केल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला आहे.
याप्रकरणी मी पीडित मुलींच्या बाजूने वकीलपत्र दाखल केले आहे. कल्याण कोर्टातील 15 ते 20 वकिलांनी पीडित मुलींना मोफत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्रात पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी भावना आहे. मी त्यामध्ये काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी इकडे आलो होतो. पण मला कोर्टात आल्यावर पोलिसांचा तपास पाहून धक्काच बसला असे असीम सरोदे यांनी सांगितले. ते कल्याण कोर्टाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
असंवेदनशील पद्धतीने तपास करुन FIR दाखल..
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी असीम सरोदे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील पोलीस तपासातील त्रुटींवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, पीडित मुलींच्या कायदेशीर मदतीसाठी पुढे आलेले वकील सांगतात की, पोलिसांनी याप्रकरणात चुकीची कलमं लावली आहेत. पोलिसांनी अपुरी कलमं लावून FIR दाखल केला आहे. पोलिसांनी पुरेशी माहिती न घेतल्यामुळे हे घडले असून त्यांनी पीडित मुलींच्या पालकांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. ही परिस्थिती विदारक आहे. वकिलांनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्रात कलम 6 चा अंतर्भाव केला.
आता वकिलांनी पॉक्सोचे सेक्शन 9 लावण्याची मागणी केली आहे, ते सुद्धा लावले जाईल. पोलीस FIRमध्ये नवीन कलमं लावली जात आहेत. ते पाहता लक्षात येत आहे की, पोलिसांनी या प्रकरणाचा नीट तपास केलेला नाही. असंवेदनशील पद्धतीने, पुरेशा माहितीअभावी तपास करुन FIR दाखल केला गेला आहे. हे कायदेशीर कमजोरीचे लक्षण आहे. पीडित मुलींना न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलिसांनी दाखल केलेला चुकीचा FIR कारणीभूत असणार आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी यावेळी केला आहे.
आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न चुकीचे.. : असीम सरोदे
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे. शाळा सुरु राहणे गरजेचे आहे, असे अनेकजण बोलताना दिसत आहे. पण मुलींवरील लैंगिक अत्याचारापेक्षा शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का? ज्या सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केला, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याने काय केलं, हे त्याला स्वत:ला माहिती नसल्याचेही म्हटले जात आहे.
पोलिसांनी अशा पद्धतीने माहिती देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण असून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत. मी त्यादृष्टीने न्यायालयात युक्तिवाद करेन. मुलगी शाळेत असताना तिच्यावर बलात्कार झाला. बोटाच्या साहाय्याने तिच्यावर अत्याचार झाला. त्या लहान मुलीला का झाले, हे सांगता येत नाही, तेव्हा हा गुन्हा आणखी गंभीर ठरतो. अशावेळेस पोलिसांनी सेक्शन 6 आणि सेक्शन 9 लावण्याची गरज होती. मी न्यायालयात युक्तिवाद करताना ही गोष्ट मांडणार आहे, असे असीम सरोदे यांनी सांगितले.