मुंबई : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली आहे. शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मधुकर पिचड यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहेत. परंतु, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्यामुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ह तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
कोण आहेत मधुकर पिचड..
जेष्ठ नेते मधुकरराव पिचड शरद पवार यांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोब ते मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले असून २०२४ पर्यंत ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार होते. २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांचा मुलगा वैभव पिचड आमदार झाले. २०१९ साली पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐनवेळी शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली. २०१९ मध्ये वैभव पिचड यांचा पराभव झाला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळे महायुतीत मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना राजकीय अडचण निर्माण झाली. उमेदवारी करण्यासाठी पर्यायाची गरज आहे. अशातच मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, ही भेट पेसा कायद्यासंदर्भात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पिचड यांनी जर शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर मात्र अजित पवार गटासमोर अडचणी वाढू शकतात.