लोणी काळभोर, ता.२३ : थेऊर सर्कल व तलाठी कार्यालयातील लाचखोरीचे पुरावे पुणे प्राईम न्यूजने समोर आणले असून थेऊर सर्कल हे हिमनगाचे एक टोक असून लाचखोरीची व्याप्ती हवेलीत दूरवर पसरली आहे. तलाठी सरला पाटील यांनी त्यांच्यासह सर्कल जयश्री कवडे यांच्यासाठी तीस हजार रुपये शेतकऱ्यांकडून उकळले होते. त्याचा पुरावा ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागल्याचे समजताच ते पैसे शेतकऱ्याला माफीनाम्यावर परत करण्यात आले. तसेच त्याच कार्यालयातील कोतवाल कांताराम लोंढे यांने मृत व्यक्तीच्या वारसांकडून ‘गुगल पे’वर एक हजार रुपये घेतले होते. या लाचखोरीच्या घटनेबाबत नागरिकांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटल्याने कोतवाल लोंढे याने शेतकऱ्याला एक हजार रुपये परत पाठवले. यातून त्यांनी नोंद करण्यासाठी पैसे घेतल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात खोलवर बुडालेल्या सर्कल, तलाठी व कोतवाल यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
थेऊर सर्कल व तलाठी कार्यालयात अत्यंत हीन कारभार सुरु आहे. प्रत्येक कामासाठी प्रोटोकॉल हे धोरण अवलंबल्याने शासकीय कामाला मुद्दामहून विलंब केला जात असल्याचा प्रकार नागरिकांच्या तक्रारीवरुन समोर आला आहे. थेऊर, कोलवडी, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील फेरफार नोटीस भरल्यानंतरही एक महिन्यांहून अधिक काळ प्रोटोकॉलच्या प्रतिक्षेत ठेवलेले आहेत. या धाडसासाठी या कार्यालयाचे धागेदोरे मंत्रालयातील सर्वोच्च पदापर्यंत असल्याचे सर्कलच्या ‘नाना’ तऱ्हेवरून स्पष्ट होत आहेत. त्यामुळे तहसीलदार, प्रांत, रजा राखीव उपजिल्हाधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सेफ गेम झोन’ची भूमिका घेतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२३ ला थेऊर कुंजीरवाडी येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने घरातील व्यक्ती मयत झाल्याने वारस नोंदीसाठी प्रतिज्ञापत्रसह विहित नमुन्यात अर्ज तलाठ्याकडे दाखल केला. मात्र, तलाठ्याने त्याची पोच दिली नाही. वारस नोंदीसाठी खर्च येत आहे. अन्यथा कोर्टातून सक्सेशेन सर्टिफिकेट आणा, असा निरोप तलाठी व सर्कलच्या कोतवालाने दिला. तसेच स्वतःच्या प्रोटोकॉलसाठी एक हजार रुपये ऑनलाईन ‘गुगल पे’वर स्विकारलेले होते. मुळातच शेतकऱ्याचा ऑगस्ट महिन्यातील वारस नोंदीच्या अर्जाला अडीच महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे, मग तलाठी यांनी सदरची वारस नोंद घ्यायला विलंब का केला? हा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत “मृत्यूनंतर वारस नोंदीसाठी द्यावे लागते लाच” या मथळ्याखाली पुणे प्राईम न्यूजने बातमी प्रकाशित केल्याने “जनाची नाही, तर मनाची तरी… या भावनेने कोतवाल लोंढे याने एक हजार रुपयांची लाच परत केली.
“सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली”
दरम्यान वरिष्ठ कार्यालयातून कारवाई होऊ शकते, यामुळे संबधित कोतवालाने शेतकऱ्याच्या मागे ससेमिरा सुरु केला आहे. माझी कोतवाल, तलाठी व सर्कल बाबत कोणतीही तक्रार नाही, असे कोतवाल महाशय शेतकऱ्याला लेखी मागत आहे. मुळातच शेतकऱ्याच्या वारस नोंदीला अडीच महिन्यांहून विलंब लावलेला आहे. अडीच महिन्यात फेरफार घेतलेला नाही. तसेच शेतकऱ्याच्या छोट्या नोंदीसाठी तलाठी सरला पाटील यांनी स्वतः व सर्कल यांच्याबाबतचा शेतकऱ्याला तीस हजार रुपये लाच मागणीचा व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिप असे लाचखोरीचे पुरावे पुणे प्राईम न्यूज च्या हाती लागल्याने थेऊर येथील कोतवालाची यंत्रणा शेतकऱ्याची काहीही तक्रार नाही, हे लिहून घेण्याबाबत सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या मागे महसूलचा ससेमिरा सुरु झाला आहे. त्यामुळे थेऊर सर्कल कार्यालयाची अवस्था “सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली” अशी झाली आहे.
“पुणे प्राईम न्यूज चे नागरिकांना आवाहन “
नागरिकांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही, सर्व शासकीय अधिकारी हे लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून कामात तुमची अडवणूक होतेय, प्रोटोकॉलसाठी प्रकरण वेठीस ठेवले जाते, खेटे मारावे लागतात, चला तर मग आपली समस्या निर्भिडपणे पुणे प्राईम न्यूजला कळवा. आम्ही आपले नाव गुप्त ठेवून आपल्या समस्येला प्रकाशित करुन प्रशासन व जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करु. आपली समस्या puneprimenews@gmail.com या ई मेल आयडीवर कळवू शकता. तसेच तक्रारदारांनी मेल करताना आपला मोबाईल क्रमांक अवश्य नमूद करावा.
जनार्दन दांडगे (मुख्य संपादक-पुणे प्राईम न्यूज)