दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ‘व्हीइसी ६’ प्रकरण न्यायव्यवस्थेच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे यात न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या मागणीची जनहित याचिका सुरजित सिंह यादव यांनी केली होती. या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीस मनमोहन आणि न्यायाधीश मनमीत प्रितम सिंह अरोरा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.
केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांना गेल्या आठवड्यात अटक केली. या अटकेविरोधात आणि रिमांडवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.