लोणी काळभोर : जन्मदात्या आईने आपल्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना घेऊन पाण्याच्या टाकीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगर परिसरात घडली असून मंगळवारी (ता.8) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत जुळ्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे थेऊरसह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा हेमंत कुमार मोहिते ( वय 35) या थेऊर येथे माहेरी प्रस्तुतीसाठी आल्या होत्या. प्रसूतीदरम्यान त्यांना जुळे मुले झाली होती. त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान, प्रतिभा यांनी अज्ञात कारणाने राहत्या घराच्या टाकीवर जाऊन जुळ्या मुलांसह उडी मारली. यात दोन जुळ्या मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने प्रतिभा यांना काही नागरिकांनी उडी मारताना पहिले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात यश आलेल्याने त्या वाचल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार महेश करे, दिगंबर जगताप, विशाल बनकर, पोलिस अंमलदार मंगेश नानापुरे, घनश्याम आडके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यात पाठविला आहे.