पुणे : दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेबीने गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज दिली आहे. गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या बदलांना सेबीने मंजूरी दिली आहे. याअंतर्गतच म्युच्युअल फंडातून पैसा काढल्यानंतर केवळ ३ दिवसात पैसे खात्यात जमा होतील.
याचप्रमाणे म्युच्युअल फंडातील लाभांशही खात्यामध्ये आठवड्यात जमा होणार आहे. याशिवाय सेबीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनेही काही नियम जारी केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे कोणत्याही फसवणूकीपासून संरक्षण करण्यात मदत होईल.
छोट्या गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील वाढता रस पाहून त्यांची गुंतवणूक आकर्षक करण्यासोबतच सुरक्षेच्या बाबींसंदर्भात नियमावली सेबीने जारी केली आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा कल समभाग गुंतवणूकीत अधिक वाढत आहे.
जलद आणि सोयीस्कर डिजिटल व्यवहारांचे फायदे लक्षात घेऊन सेबीने म्युच्युअल फंड युनिट्सची विक्री करण्यासाठी लागणारा वेळ एक तृतीयांश कमी केला आहे. यामध्ये 10 दिवसांऐवजी आता फक्त तीन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम येईल. म्युच्युअल फंड लाभांश येण्यासाठी लागणारा वेळही निम्म्याने कमी होईल. लाभांश आता 15 दिवसांऐवजी सात दिवसांनी जमा होईल.
सेबीने यासंदर्भात जारी केलेल्या नियमानुसार, गुंतवणूकदारांनी मागील व्यवहार आणि निधी उभारणीच्या क्रियाकलापांवर आधारित ऑफर किंमत जाहीर करणे बंधनकारक आहे. सेबीच्या संचालक मंडळाने आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे सादर करू पाहणाऱ्या कंपन्यांना गोपनीयपणे नियामक माहिती प्रदान करण्याची परवानगी देऊन पर्यायी यंत्रणा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.