मुंबई: बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या प्रकरणात आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. राज्यपालांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संतोष देशमुख प्रकरणात आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी राज्यपालांना केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. अजित पवार आता या प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत काय निर्णय घेतील? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांकडून देण्यात आलं आहे. आता उद्या सर्वजण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. धस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एवढंच नाही तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत, असा आरोपही यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे.