पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असताना दही, लस्सी, धान्यावर जीएसटी लावल्यामुळे केंद्रसरकारवर टीकेची झोड उठली होती.
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारायची गरज नसतानाही केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय दिला होता. पण आता लोकक्षोभामुळे सुटे धान्य, दही आणि लस्सीवरील जीएसटी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे समजते.
जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीवरून संसदेत विरोधी पक्षाने आवाज उठवला होता. वाढत्या महागाईने कसे होणार, याच्या काळजीने गरीबच काय पण सर्वसामान्यही हवालदिल झाले होते.
आधीच कोविड १९ मुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला असून खायचे काय, हा प्रश्न उपस्थित होत होता. जनताही या निर्णयामुळे चिडली होती. हे सर्व पाहता आज वरील पदार्थांवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सुट्या डाळी, गहू, मोहरी, मका, तांदूळ, रवा, बेसन, दही, लस्सी यावर आता पाच टक्के जीएसटी बसणार नाही, अशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून घोषणा केली आहे.