मुंबई : अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यासह देशात एकच खळबळ उडाली होती. सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्वेतील कार्यालयाबाहेरच हा गोळीबार करण्यात आला होता. रात्री नऊच्या आसपास बाबा सिद्दीकी कार्यालयातील कामकाज उरकून आपल्या घराकडे निघाले होते, त्यावेळी कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या तीन जणांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलाहोता. ज्यात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांची हत्या घडवून आणल्याचे समोर आले होते.
आता सिद्दीकी यांच्या हत्येच्या अडीच महिन्यानंतर हत्येचं खरं गूढ उलगडलं आहे. बाबा सिद्दीकी यांचं सलमान खानशी असलेल्या कनेक्शनमुळेच ही हत्या झाल्याचं आरोपत्रातून आता समोर आलं आहे. सुरुवातीला सिद्दीकी यांची हत्या वांद्रे पूर्वेतील एका एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याचा आरोप पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला होता. मात्र पोलीस तपासात याबाबत कोणताही अँगल समोर आला नसल्याचं पोलीसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. हे आरोपपत्र लवकर पोलीसांकडून कोर्टात सादर जकरण्यात येणार आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी १४ एप्रिलला लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीवर गोळीबार केला होता. काळवीट शिकार प्रकरणातून हा गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. ज्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनुज थापन याचा समावेश होता. थापनला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र थापनच्या मृत्यू प्रकरणात बाबा सिद्दीकी यांचं कनेक्शन आहे, त्यामुळेच ही हत्या केल्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगचा दावा होता. आता याला कुठेतरी पोलिसांकडून दुजोरा मिळताना दिसून येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, सलमान खान यांच्याशी असलेल्या संबंधांमुळेच सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच वांद्रे पूर्वेतील एसआरए प्रकल्पाच्या वादाशी हत्येचा काहीही संबंध नाही, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २६ आरोपींविरोधातलं आरोप पत्र मकोका न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे.