विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार ते थेट पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वांचा एकच ड्रेसकोड, गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात लेझीमवर धरलेला ठेका, पारंपरिक वेशातील महिलांची फुगडी… अशा उत्साही वातावरणात निघालेली लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक यावर्षी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
राज्यातील गणेश मंडळांसमोर आदर्श
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या बाप्पाला लोणी काळभोर पोलिसांसह पूर्व हवेलीतील नागरिकांनी आज उत्साही व शांततापूर्ण वातावरणात निरोप दिला. गणरायाचा निरोप घेताना लोणी काळभोर पोलिसांनी आदर्श विसर्जन मिरवणूक कशी असावी, याचा वस्तुपाठ पुणे शहर पोलिसांसह राज्यातील गणेशोत्सव मंडळांसमोर घालून दिला. हवेली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात तरीही शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली मिरवणूक पाहिली, अशी चर्चा दिवसभर लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये होती.
मुळा-मुठा नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गणरायाची आरती आज (ता. २५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. दत्तमंदिर, खोकलाई देवी चौक, गणपती मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, पाषाणकर बाग, साधना बॅंक, सोलापूर महामार्ग व एमआयटी या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. एमआयटी शेजारच्या मुळा-मुठा नदीत दुपारी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
‘ग्यानबा तुकाराम”च्या चालीवरील पदन्यास लक्षवेधी
लोणी काळभोर पोलिसांनी काढलेल्या मिरवणुकीत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांतील राजकीय पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी व महिला पोलीस पाटलांनी गणरायासमोर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या मिरवणुकीत आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने गणपती बाप्पांसमोर पारंपरिक पद्धतीने हरिपाठ म्हणत ‘ग्यानबा तुकाराम”च्या चालीवर केलेल्या पदन्यासाने सर्वांचे लक्ष वेधले.
टाळ, मृदंग, ढोलकीच्या तालात आनंदोत्सव
लोणी काळभोर गावातील कन्या शाळेतील मुलींनी लेझीम खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला. या वेळी सोरतापवाडी येथील आरंभ ढोल-ताशा पथक व लोणी काळभोर येथील बाबा नाशिक बाजा ढोल-ताशा पथक यांनी वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात केली. या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळ, मृदंग व ढोलकी वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मिरवणुकीदरम्यान श्रींचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी पूर्व हवेलीतील शेकडो गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवली.
पोलिसांच्या एकाच ड्रेसकोडची चर्चा
मिरवणुकीत सहभागी झालेले लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार ते पोलीस शिपाई या सर्वांचा एकच ड्रेसकोड, हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. बाप्पांसमोर सर्व भक्तगण एकसारखेच… कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही, हाच संदेश या कृतीतून पोलिसांनी समाजाला दिला. या ड्रेसकोडमध्ये प्रत्येकाने फेटा, कुर्ता, पायजमा तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने साडी परिधान केली होती.
डिजेचा दणदणाट, गुलालाच्या उधळणीला फाटा
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षी गणपतीची पारंपरिक पद्धतीने सातव्या दिवशी काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक ही परिसरातील मंडळांनी आदर्श घेण्यासारखी असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. एरवी मिरवणूक म्हणजे डिजेचा दणदणाट, गुलालाचा बेसुमार वापर व मद्यपींचा तमाशा… असे समीकरण असते. मात्र, या विसर्जन मिरवणुकीत या सर्व प्रकारांना फाटा देवून, एक आदर्श घालून दिला आहे. या मिरवणुकीतून धडा घेण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, शिवशांत खोसे, उपनिरीक्षक किरण धायगुडे, अमित गोरे, विष्णू देशमुख, सदाशिव गायकवाड, सर्व अंमलदार व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.