अजित जगताप
सातारा : दुष्काळी परिस्थिती जिद्दीने उभे राहिलेल्या माण वासीयांना परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. मलवडी,श्री पालवन,मुगराळे परिसरात वाटाण्याच्या खूप मोठे नुकसान झाले असून अध्याप ही पंचनामे होऊ शकले नाही. हे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते करीत आहेत.
माण तालुक्यातील वाटाण्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या हा वाटाणा मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जातो.सुमारे चारशे हेक्टर पेक्षा जास्त वाटाणा पीक घेतले जाते. परिसरातील वाटाणा,घेवडा, मूग, बाजरी,घेवडा पीकाचे मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. राज्य शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना केली आहे. पण, अध्याप ही कृषी अधिकारी तथा महसूल विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत
माण तालुक्याच्या डोंगरावर असणाऱ्या श्रीपालवण, उगळेवाडी, गरडाचीवाडी, खांडेवाडी, कळसकरवाडी, कुळकजाई, बोथे, खोकडे, परतवडी, शिरवली तसेच परकंदी, गायदरा, गाडेवाडी, सत्रेवाडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटाण्याचे पीक घेतले जाते. कमी पावसावर, अल्प कालावधीत येणारे व चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून वाटाणा पीकाकडे शेतकरी वर्ग व घाऊक व्यापाऱ्यांकडून पाहिले जाते.
मागील काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे व दाट धुक्यामुळे वाटाण्यावरील बुरशीचे प्रमाण वाढून शेतकर्यांना नुकसान होत होते. बुरशीमुळे वाटाणा दर सुध्दा चांगला मिळत नव्हता. या वर्षी मात्र शेतात तरारुन आलेले पिक आणि बाजारातील दर हे दोन्ही शेतकऱ्यांसाठी चांगलेच अनुकूल होते. कधी नव्हे ते चांगला दर बराच काळ टिकून होता. एवढे सगळे चांगले वातावरण असतानाच वाटाणा तोडणीच्या अखेरच्या टप्प्यात आलेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे.
सलग आठवडाभर पडलेल्या पावसाने शेतात पाणी साठून वाटाणा पीक पाण्यात बुडाले. तोडणीला आलेला वाटाणा शेतातच अक्षरशः सडून गेला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले आहे. पण,जिल्हा प्रशासनाने अध्याप गांभीर्याने विचार केला नाही. ना मंत्री,ना पालकमंत्री ना खासदार ना आमदार ना तहसीलदार,ना जिल्हा व पंचायत समिती सदस्य यांचे पाहणी दौरे होत नाहीत. नुसत्याच शासकीय बैठका व हारतुरे, बातम्यांचा ढीग पहाणे गरीब शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. अशी सरास टीका होऊ लागली आहे.
वाटाणा बियाणे, शेती मशागत, खते, मजूर आणि शेत ते बाजार समिती वाहतूक खर्च यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच उभे पीक शेतात सडून गेल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. एकूण परिस्थिती पाहता आता भांडवली खर्च सुध्दा निघेल की नाही? याची शाश्वती राहिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका पुढे गेल्यावर तथाकथित नेतेगण गायब झाले आहेत.ते आता पुढील वर्षी उगवतील अशी टीका ही ग्रामस्थ व शेतकरी करू लागले आहेत.
दरम्यान, “या वर्षी शेतकऱ्यांनी सव्वाशे किलो वाटाणा बियाणाची लागवड केली होती. बियाणे, खते, मशागत, वाहतूक खर्च आणि मजुरी असा आतापर्यंत पन्नास हजार रुपये खर्च झाला आहे. पण नेमक्या तोडणीच्या वेळेस आलेल्या मुसळधार पावसाने सर्व पीक शेतात नासून गेल्याने झालेला निघणे अवघड झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा.”