नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर तीनही राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राज्यांमधील पराभवांची कारणमीमांसा करण्यात येत आहे. यामुळे काँग्रेस पक्षांची सूत्रे आता नव्या पिढीकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती समजत आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निष्ठावंत गोविंदसिंह डोटासरा, मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ तर छत्तीसगडमध्ये दीपक बैज सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. यापैकी कमलनाथ यांच्याबद्दलचा असंतोष निकालानंतर स्पष्ट दिसून आला आहे. तसेच कमलनाथ यांच्या एककल्ली स्वभावामुळे आणि त्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याची भावना नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
तसेच अशोक गेहलोत यांचा एकछत्री अंमलही आता समाप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या एकछत्री कारभारामुळे सचिन पायलट यांना दूर केल्याने गुर्जर समाज नाराज झाल्याचे चित्र दिसून आले आहे. आता बदललेल्या स्थितीमध्ये पायलट गटाला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबद्दल व तसेच उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांच्यातील संघर्षामुळे पक्षाला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांना छत्तीसगडमध्ये प्रभाव पाडता आला नाही. यामुळे या तिन्ही राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलून तरुणांना संधी देण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्ष श्रेष्टीने ठरविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.