पुणे : ब्लाब्ला कार किंवा कार पुलिंगसाठी उपयोग केले जाणारे ॲप्स वापरून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर आता परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी डमी प्रवासी बनून कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागानं दिल्या आहेत. परिवहन विभागाच्या या कारवाईचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
एरवी एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्लाब्ला कारपुलिंग या ॲपेने उपलब्ध करून दिली होती. मुंबई,पुणे,नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना कारपुलिंगमुळे फायदा व्हायचा. त्यातच पैशांची, इंधनाची बचत अशा कारणांमुळे अल्पावधीत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं होतं. आणि प्रवाश्यांकडून या ॲपेला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
परिवहन विभागाच्या आदेशावर प्रवाश्यांकडून टीका
पण आता परिवहन विभागाने नवा फतवा काढत ब्लाब्ला कारचे पिकअप पॅाईंट शोधून त्यावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यासाठी अगदी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अशा सूचना ही दिल्या आहेत. मात्र या आदेशावरून परिवहन विभागावर टीका सुरू झाली आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून मिळणारा मलिदा हाच खरा या आदेशामागचा उद्देश आहे, अशी टीका प्रवाशांकडून केली जात आहे.
पुण्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी काय म्हणाले?
परिवहन विभागाने कार पुलिंग ॲपे वापरून खाजगी वाहतूकीला प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कायद्यानुसार घेण्यात आला असल्याचं परिवहन अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. कारपुलिंग करताना आर्थिक व्यवहार न करणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही कारवाई आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केली जात आहे.असा निर्वाळा परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. असे पुण्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांनी सांगितले आहे.
कारपुलिंगच्या सोईने आणि ॲपवर चालका बाबातच्या रिव्ह्युमुळे सध्यातरी ब्लाब्ला कार हा चांगला विकल्प ठरत आहे. मात्र कायद्याला हेतू समजत नसल्याने या उत्तम पर्यायावर गदा येणार आहे. त्यामुळे धोरणात्मक पातळीवर या पर्यायास अधिकृत मान्यता मिळू शकेल का हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.