योगेश मारणे / न्हावरे : गुणाट (ता. शिरूर) येथील चिंचणी रस्त्यावर शिरूरच्या महसूल व पोलीस विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पकडलेले दोन हायवा ट्रक तसेच चालक आणि मालक यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ६० लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
महसूल व पोलीस प्रशासन यांना न जुमानता वाळू चोरांनी मोठ्या राजकीय वरदहस्तामुळे शनिवारी (दि. २८) रात्री ११ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी (दि. २९) दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे १४ तासांपेक्षा जास्त वेळ जाऊनही कारवाई रोखून ठेवली होती. त्यामुळे संबंधित विभागांची संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच नाचक्की झाली होती. त्यामुळे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी तडाखेबंद कारवाई केली आहे.
या संयुक्त कारवाईमुळे वाळू चोरांमध्ये काही प्रमाणात धाक निर्माण झाला असून, येथून पुढेही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित वाळू चोरीची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन भोई यांनी दिली असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.
ही वाहने केली जप्त
संयुक्त पथकाने वाळू चोरी करत असताना हायवा ट्रक नंबर – एम.एच-१२, डब्ल्यूएक्स-६१९९ व एम. एच-१२, पीक्यू-००९९ ही वाहने जप्त केली आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी त्यांच्या मालकांचाही शोध सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.