लोणी काळभोर, ता.१९ : थेऊर सर्कल व तलाठी कार्यालयात शेतकऱ्याकडून तीस हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजने बुधवारी व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये तलाठी व सर्कल एकमेकांसाठी शेतकऱ्याकडून पैसे लाटत असल्याचे दिसले. परंतु, त्याच कार्यालयातील कोतवालही पैसे खाण्याच्या या प्रक्रियेत भागीदार असल्याचाच पुरावा समोर आला आहे. त्यामुळे थेऊर कोतवाल, तलाठी आणि सर्कल प्रोटोकॉलसाठी ‘हम साथ साथ है’ म्हणत कारभार करत आहेत. यामुळे मडंलस्तर व तलाठी कार्यालयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.
दरम्यान १८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सर्कल कार्यालयातील कोतवाल कांताराम लोंढे याने वारस नोंदीसाठी एका शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये ऑनलाईन ‘गुगल पे’वर घेतले असून त्याचा पुरावा ‘पुणे प्राईम न्यूज’ च्या हाती लागला आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे ‘गुगल पे’ केलेल्या रिसीटमध्ये “वारस नोंद” असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे थेऊर सर्कल, तलाठी कार्यालयात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अंदाज संपूर्ण जिल्ह्याला येऊ लागला आहे. या सर्व प्रकारानंतरही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत धृतराष्टाची भूमिका घेतल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वारस नोंदीसाठी पैसे खाणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे
दिलेल्या माहितीनुसार, थेऊर येथील कुंजीरवाडी भागातील एका शेतकऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले की, कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्याने त्यांचे सातबारावरील नाव कमी करुन वारसांची नावे दाखल करण्यासाठी दीड दोन महिन्यांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, प्रोटोकॉल होत नसल्याने अर्ज तसाच बाजूला पडला होता. अखेर लोंढे या कोतवालाने सबंधित शेतकऱ्याला तलाठी व सर्कलच्या आर्थिक समीकरणाची कल्पना देऊन स्वतःचा खर्च सांगितला. प्रोटोकॉल करणार नसेल तर कोर्टात जाऊन सक्सेशेन सर्टिफिकेट (वारस प्रमाणात) आणावे लागेल, असा मॅडमचा निरोप शेतकऱ्याला कळवला. शेतकऱ्याकडे रोख रक्कम नसल्याने कोतवालाने गुगल पे वर रक्कम घेतली.
हवेलीत तीन वर्षांपूर्वी वाळू वाहतूकदारांनी तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते यांना गुगल पे वर एक रुपया पाठवल्याने मोठी खळबळ माजली होती. मात्र, त्याच तालुक्यात थेऊर सर्कल व तलाठी कार्यालयातील कोतवालाने गुगल पे वर एक हजार रुपये स्विकारले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या सिस्टमबाबत प्रचंड चीड व राग आहे. मात्र, तलाठी व सर्कलकडून प्रोटोकॉलच्या नावाखाली शेतकऱ्यांना खेटे मारण्यासह विलंबाचा कोलदांडा सुरू असल्याने वारस नोंदीचे अर्ज बाजूला ठेवले जातात. शेतकऱ्यांना त्या अर्जाची पोच देखील दिली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार थेऊर महसूलमध्ये सुरू आहे.
“पुणे प्राईम न्यूज चे नागरिकांना आवाहन “
नागरिकांनो घाबरु नका, शासकीय अधिकारी हे लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून कामात अडवणूक होतेय, प्रोटोकॉलसाठी प्रकरण वेठीस ठेवले जाते, हेलपाटे मारावे लागतात, चला तर मग आपली समस्या निर्भिडपणे पुणे प्राईम न्यूज ला सांगा. आम्ही आपले नाव गुप्त ठेवून आपल्या समस्येला प्रकाशित करुन प्रशासन व जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करु, त्यासाठी पुणे प्राईम न्यूज च्या [email protected]. या ई मेल आयडी वर संपर्क साधावा. तसेच तक्रारदारांनी मेल करताना आपला मोबाईल क्रमांक अवश्य नमूद करावा.
जनार्दन दांडगे (मुख्य संपादक-पुणे प्राईम न्यूज)