लोणी काळभोर, ता.२८ : गेली बारा वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पांडुरंग काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंत कारखान्यासंदर्भात कारखाना बंद झाल्यापासून आजपर्यंत एकुण १२ याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यातील एका याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
आर्थिक अनियमितेमुळे २०११ मध्ये हा कारखाना बंद पडला होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर ११ मार्च २०२३ रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत यशवंत सुरू करण्यासाठी कारखान्याची कोणतीही मालमत्ता भाड्याने न देता अथवा न विकता तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने करावा, असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. त्यानुसार, साखर आयुक्तांना निवडणूक खर्चासाठी ४० लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सभासद शेतकरी सहकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, यशवंतच्या ताळेबंदात रक्कम शिल्लक नसल्याने निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी निधी उभारावा या आवाहनानुसार सभासदांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडणूक होईपर्यंत सदर रक्कम डिपॉझिट म्हणून राहणार आहे. कारखाना सभासदांच्या ताब्यात गेल्यानंतर किरकोळ व्याजासह नवीन संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचे ठरले आहे.
बारा वर्षांनंतर होणार निवडणूक प्रक्रिया
आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, त्यानंतर सभासद नियुक्त संचालक मंडळ कारभार हाती घेईल. त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमितेमुळे बारा वर्षांपूर्वी बंद पडला. हा कारखाना चालू व्हावा यासाठी अनेक प्रयत्न झाले.
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या अनेक निवडणुका लढल्या गेल्या. परंतु कारखाना आजपर्यंत चालू होऊ शकला नाही. कारखाना सुरू झाल्यावर हवेली तालुक्याला गत वैभव पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी स्थापन केलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे धुराडे तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याचिकाकर्ते पांडुरंग काळे यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी काम पाहिले.
न्यायालयाच्या आदेशामुळे युवा राजकीय नेत्यांना नवसंजीवनी
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची तब्बल वीस वर्षांनंतर निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत हवेली तालुक्यातील युवा नेतृत्वाला वाव मिळाला आहे. आगामी दोन महिन्यांत यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर या निवडणुकीत ही हवेली तालुक्यातील युवा नेतृत्वाला वाव मिळणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे दबून राहिलेल्या युवकांना या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पटलावर येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे हवेली तालुक्यातील युवक कार्यकर्ते खुश झाले आहेत.
आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतही उभे राहून आपल्या राजकीय कार्याला झळाळी देण्यासाठी अनेक युवक उत्सुक आहेत. एकंदरीत गेली अनेक वर्षं आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षाना मुरड घालावी लागलेल्या हवेली तालुक्यातील युवकांना आगामी काळात होणा-या वेगवेगळ्या निवडणूकांना उभे रहाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे युवावर्ग आजच्या न्यायालयाच्या आदेशाने आनंदी झाला आहे.
आजचा न्यायालयाचा निर्णय म्हणजे सभासद, कामगारांचे यश
कारखाना सुरू होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक आहे. या संदर्भात तालुक्यातील सभासदांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तब्बल ४० लाख रुपये कारखाना प्रशासनाकडे जमा केले आहेत. आजचा न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे निवडणूक निधी देणाऱ्या त्या सर्व सभासदांसह २२ हजार शेतकरी सभासद, कामगार यांचे हे यश आहे. १ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही तर परत न्यायालयात जाणार आहोत.
– पांडुरंग काळे, माजी संचालक (याचिकाकर्ते).