पुणे : पुण्यामध्ये वाहनांची संख्या अफाट वाढल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची वाहनांसाठी असणारी जुनी ‘ZZ’ ही शेवटची सिरीज आता अवघ्या १५ दिवसांत संपणार आहे. त्यामुळे पुण्यासाठी नवीन ‘MH-61’ हा कोड दिला जाईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, ‘MH-12’ ही पुणेकरांची खरी ओळख आणि अस्मिता मानली जाते. हा कोड बदलू नये यासाठी खासदार मुरलीधर मोहळ यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली आणि त्याला मंजुरी मिळवली. त्यामुळे पुण्याचा ‘MH-12’ हा नंबर कायम राहणार आहे.

सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार गाड्यांच्या नंबरप्लेटवर तीन इंग्रजी अक्षरांची मालिका वापरता येत नाही. त्यामुळे पुणे RTO ने या समस्येवर एक नवा आणि अनोखा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी ‘१ अंक आणि १ इंग्रजी अक्षर’ (उदा. 1A) अशा नव्या प्रकारच्या सिरीजचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.

या नव्या प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाची अंतिम मान्यता मिळताच, पुणेकरांच्या वाहनांवर MH 12 1A 0000 अशा स्वरूपाचे नंबर दिसू लागतील. अंक आणि अक्षर एकत्र वापरून वाहनांची नोंदणी करण्याचा असा प्रयोग करणारे पुणे हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

दोन अक्षरांची (AA ते ZZ) मालिका पूर्ण झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीवर हा ‘1A’ फॉर्म्युला अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग ठरणार आहे. येत्या काही दिवसांत यावर केंद्र सरकारकडून अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुणेकरांचा ‘MH-12’ चा अभिमान तसाच टिकून राहणार आहे.







