पुणे: महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृती आणि टिकाऊ नवोन्मेषाचे अप्रतिम प्रदर्शन म्हणून ओळखला जाणारा आणि गेल्या १८ वर्षांपासून सुरू असलेली भीमथडी जत्रा यंदा २० ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर ग्राउंड, सिंचननगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित जत्रा ग्रामीण शिल्पकार, उद्योजक आणि शहरी प्रेक्षकांना एकत्र आणत पारंपरिकता आणि आधुनिकतेचा उत्सव साजरा करेल, असा दावा या भीमथडी जत्रेच्या मुख्य संयोजक सुनंदा पवार यांनी केला आहे.
या वर्षीची जत्रा पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्या २५ व्या पुण्यतिथीला समर्पित आहे. भारतीय कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आप्पासाहेब पवार यांचा डिप इरिगेशन प्रणालीसारख्या क्रांतिकारी योगदानांसाठी सन्मान केला जाईल, त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जत्रेच्या प्रवेशद्वारानंतरचा पहिला विभाग त्यांचा जीवनपट आणि ऐतिहासिक कार्याची माहिती टाइमलाईनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यासाठी समर्पित केला जाईल. यामुळे जत्रा कृषी नवोन्मेष आणि ग्रामीण प्रगतीशी घट्ट जोडलेली जाणार आहे. भीमथडी जत्रा २०२४ किमान एक लाख पर्यटकांना आकर्षित करेल आणि हे ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे तसेच सांस्कृतिक आदानप्रदानाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनेल.
या वर्षीची प्रमुख आकर्षणे अनेक असल्याचे नमूद करताना पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे विभाग, ज्यामध्ये रेसिड्यू-फ्री उत्पादने प्रमुख असतील. यामुळे या उत्पादनांच्या आरोग्यदायी फायद्यांची आणि टिकाऊपणाची माहिती स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. यामध्ये जीआय-प्रमाणित उत्पादने, ताजे शेतमाल आणि मध यांचा समावेश असणार आहे. भीमथडी सिलेक्ट विभागात ३० प्रीमियम स्टॉल्स असतील, जे भारतातील १२ वेगवेगळ्या राज्यांमधून असतील. यामध्ये नैतिक रंगांनी तयार केलेली वखे, पारंपरिक कातकिणी तंत्राद्वारे तयार केलेली जीवनशैली उत्पादने यांचा समावेश असेल.
तेलंगणा स्टॉल्स पहिल्यांदाच या वर्षी जत्रेचा भाग असणार आहे. खाद्य विभाग या जत्रेत असणार आहे. ज्यात पर्यटक मालवणी सीफूड थाळी, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रसा आणि उकडीचे मोदक, खापरीवरची पुरणपोळी यासारख्या पारंपरिक महाराष्ट्रातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. ही जत्रा दि. २० ते २५ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आहे.