सागर जगदाळे
भिगवण: भाद्रपदी बैलपोळ्यासाठी भिगवण (ता. इंदापूर) येथील बाजार पेठ आज रविवारी (ता.२५) सजली आहे. खरेदीला शेतकऱ्यांची लगबग सकाळपासूनच दिसत आहे.
भिगवण शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठ जनावरांच्या साज-सामानाने सजली आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे.परंतु या बैलपोळ्याच्या सणावर लंपी या संसर्गजन्य रोगाचे सावट निर्माण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या रोगाची धास्ती दिसून येत असून बैलपोळा साजरा करावा का नाही अशी द्विधा मनस्थिती बळीराजाच्या मनात निर्माण झाली आहे.त्यात मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असली तरी दोन वर्षांनी होणारा बैलपोळा आनंदात साजरा करण्यासाठी शेतकरी बैलांना मोठ्या आनंदात रंगवणार असून घरीच त्यांची पूजाअर्चा करणार आहेत.
बैलांचा साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. बाजारपेठेत घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी या वस्तू दाखल झाल्या आहेत तर शेतकऱ्यांची हे सामान खरेदी करण्यासाठी आज गर्दी पाहायला मिळत होती .
भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात सण, उत्सवाची उधळण होत असते. नागपंचंमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त भिगवण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, आणि घुंगुरुच्या माळांनी दुकानेही सजली आहेत.
७ ते ८ लाखांची उलाढालीची शक्यता:-
भिगवण बाजारपेठेत पोळ्यासाठीचे साहित्य विक्रीस आले आहे. खरेदीसाठी ग्रामीण भागातील आण्णा, बाबा, नाना, आबांसह सर्वांनीच भिगवण शहरात हजेरी लावत आहेत. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम मिळावा या उद्देशासह त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण थाटामाटात ग्रामीण भागात साजरा केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने बाजारातील काहीसी मंदी कमी झाली आहे. यंदा बाजारपेठेत जवळपास ७ ते ८लाखांची उलाढाल होण्याची शक्यता भिगवण बाजारपेठेतील संजय ट्रेडर्स चे मालक संजय खाडे यांनी सांगितली.
बळीराजाची धडपड
सजावटीचे सामान पुणे, मुंबईहून मागविण्यात आले आहे. त्यात बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगबिरंगी झुल, घुंगरांचा पट्टा, हिरव्या रंगाची गोंडे, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांच्या माळा, घुंगरांच्या माळा दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी नटूनथटून सजलेल्या आपल्या सर्जाराजाला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनविलेली दिटमणीही बाजारात दाखल झाली आहे. बैल जोडी सजवण्यासाठीचा खर्च हा कमीत कमी १००० ते २५०० रुपयापर्यंत होत असतो. या सर्व साहित्याची खरेदीसाठी बळीराजाची धडपड सुरू झालेली दिसून येत आहे.
दरम्यान, लंपी या संसर्गजन्य आजारामुळे जरी गावातून मिरवणूक काढण्यास बंदी असली तरी बैलांना चांगले सजवून अंगणातच फिरवून आणून घरीच गोडधोड खायला घालून विधिवत त्यांची पूजाअर्चा करणार आहे, असा मानस भिगवनमधील शेतकरीवर्गाने व्यक्त केला आहे.