बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथे एका महिलेला चार जणांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेला बेदम मारहाण करून नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी घरातील महिलांसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील आशाबाई वैजीनाथ कोकाट या आपले पती वैजिनाथ कोकाट आणि मुले अनिल व कृष्णा यांच्यासोबत राहतात. शेती व्यवसाय करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 22 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास आशाबाई आणि त्यांची सून मनीषा अनिल कोकाट घरामध्ये असताना अचानक संदिपान अरुण कोकाट, शिवराज गंगाधर कोकाट, अरुण सखाराम कोकाट आणि मधुकर मुरलीधर कोकाट सर्व त्यांच्या घरी दारू पिऊन आले
या चारही आरोपींनी महिलेचा विनयभंग करत बेदम मारहाण केली. अमानुष मारहाणीचे त्यांच्या पाठीवरती व्रण आहेत. आरोपींनी घरातील साहित्य आणि भांड्याचीही नासधूस केली. तसेच आमच्या नादी लागाल, तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देखील आरोपींनी दिली.मात्र पीडित कुटुंबाने तलवाडा पोलीस ठाणे गाठून चौघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडितेच्या नात्यातील आहे. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.