बीड : बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले असून २८ डिसेंबरला सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा काढत आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अशातच बीडमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीडच्या परळी तालुक्यात हवेत गोळीबार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या परळी तालुक्यात हवेत गोळीबार करण्याचा प्रकार घडला आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर, परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हवेत गोळीबार आणि बंदुकीचे फोटो सोशल मीडियात अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिक हरिश्चंद्र याच्याकडे परनवानाधारक बंदुक असून त्यानं बंदुकीसह फोटो काढून तो सोशल मीडियात अपलोड केला होता. फोटो अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तसेच परवान्यातील नियमांचे उल्लंघनही केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे यानं १४ सप्टेंबर २०२३ रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक १२ बंदुकीतून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुणाल श्रीकांत याने बंदुकीचे फोटो सोशल मीडियात अपलोड केले. बंदुक परवाना नसतानाही त्यानं बंदुकीचे फोटो अपलोड केले होते. या प्रकरणी त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.