पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पती-पत्नीची भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीच्या आत्येभावाला कात्रज टेकडीवर नेऊन बेदम मारहाण करून त्याला खाणीमध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय अनिल पाचवणे (वय २१, रा. साठे चौक, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेखर कांबळे, लखन कांबळे आणि अमोल (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या मामाच्या मुलीने फोन करून त्याला सांगितले की, तिचा पती शेखर सतत तिच्याशी वाद घालून मारहाण करत आहे. यामुळे मला आईकडे सोडायला ये. त्यानुसार अजय तिच्या घरी गेला. तेथे शेखरने अगोदरच मित्र बोलावून घेतले होते. त्यांनी अजयला मारहाण करत जबरदस्तीने कात्रजच्या टेकडीवर नेले.
तेथे बांबूने आणि दगडाने मारहाण करून दात तोडून हात फ्रेंक्चर केला. अजय तेथून पळून जात असताना त्याला धक्का दिल्याने तो खाणीत पडला. खाणीत पडल्याने त्याचा मणका आणि दोन्ही हात फॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.