जेव्हा आपलं मूल मोठं होत असतं तेव्हा जबाबदारी आणखीनच वाढत जाते. त्यामुळे बाळाच्या पालनपोषणाकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असे सर्वच पालकांना वाटत असते. पण अशा काही गोष्टी आहेत त्या मुलाच्या पाच वर्षांपर्यंत त्याला शिकवल्यास त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो.
मुलांना एकमेकांसोबत खेळणी शेअर करायला आणि एकटे न खेळता ग्रुपमध्ये खेळण्यास प्राधान्य द्या. त्यावेळी एकमेकांची काळजी घ्यायला शिकवा. मुलांमध्ये ही एक चांगली सवय म्हणून पुढे येऊ शकते. सामायिक करण्याची सवय लावून, मूल सामाजिक बनते आणि त्याच्यामध्ये चांगले आचरण विकसित होते. तुमच्या मुलाला त्याची चूक मान्य करायला शिकवा. त्याच्यामुळे एखादा दुखावला असेल तर तेव्हा माफी मागायला, सॉरी म्हणायला शिकवा.
हे जरी अगदी लहानपणी वाटत असले तरी ही गोष्ट, ही सवय भविष्यात खूप चांगले संस्कार म्हणून उदयास येऊ शकते. जेव्हा मुले दोन ते तीन वर्षांची असतात तेव्हा त्यांना अशा भावनांवर प्रतिक्रिया देण्यास शिकवणे सोपे होते. त्यामुळे मुले मोठी होऊन सभ्य होतात. तसेच तुमच्या मुलांना लहानपणापासूनच इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावा. त्याला कथा सांगा, त्याला तुमचे विचार सांगा. असे केल्याने मुलांमध्ये ऐकण्याचे कौशल्य विकसित होते.