पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी पसरली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीसोबत राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात घट झाली असून काही शहरातील पारा हा १० अंशापर्यंत खाली घसरला आहे. पुढील दोन दिवसांत राज्याचा पारा आणखी दोन ते तीन अंशानी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात अधिक हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. संक्रातीच्या वेळी राज्यात थंडी आणखी वाढू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळलेली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सध्या कमी झाला आहे, पण सोमवारपासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
पहाटे थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका..
पहाटे थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका सध्या जाणवत आहे. स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. काही शहराचे कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. जळगाव, धुळे आणि निफाडमधील पारा सध्या दहा अंशाच्या खाली घसरला आहे. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली, मंगळवारी सोलापूरचे तापमान ३२ अंशापर्यंत पोहचले होते.
हवामान विभागाने राज्याच्या किमान तापमानात आज २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गारठा आणखी वाढला आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.