Health tips : सध्या अनेकांना रक्तदाब, मधुमेहाची समस्या जाणवत असते. ही एक सामान्य समस्या असली तरी याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर समस्या गंभीर होऊन जाते. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पूर्वी मधुमेह असो वा रक्तदाब ही समस्या वयोवृद्धांनाच जाणवत होती. मात्र, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत अगदी तरुणांमध्येही समस्या दिसून येते.
टाईप-2 मधुमेह हा प्रौढांमध्ये अधिक आढळून येत असला तरी लठ्ठपणा आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्येही सध्या मधुमेह दिसून येतो. तुमच्या मुलांमध्ये टाईप-2 मधुमेहाचे व्यवस्थापन किंवा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. पोषक आहार, शारीरिक हालचाली आणि व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मुलाला प्रोत्साहित करा. लहान मुलांमध्ये मधुमेहाचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो.
लहान मुलांमध्ये मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांपैकी कोणाला किंवा कुटुंबातील सदस्याला मधुमेह असल्यास मुलांमध्येही हा धोका वाढतो. साधारणपणे, टाईप-1 मधुमेहाची प्रकरणे मुलांमध्ये अधिक दिसली. लठ्ठपणा हे लहान मुलांमध्ये टाईप-2 मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. जास्त वजन शरीराच्या पेशींना इन्सुलिन योग्यप्रकारे वापरण्यास अडथळा आणते, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो.