बारामती : मुख्यमंत्री माझी शाळा अभियानामध्ये बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने खासगी शाळांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे. या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. या अभियानामध्ये राज्यातील १ लाख ३ हजार हून अधिक शाळा सहाभागी झाल्या होत्या. येत्या ५ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शाळेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवण्यात आले होते. राज्यातील १ कोटी ९९ लाख विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यांकन समितीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मूल्यांकन केले आणि ८ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये सरकारी आणि खासगी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. खासगी शाळांमध्ये राज्यात शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने दुसरा क्रमांक मिळवला.
शाळेने केलेली वीजबचत आर्थिक साक्षरता डिजिटल उपकरणांचा वापर लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण अभियानाअंतर्गत परसबाग अन्नाची योग्य रीतीने विल्हेवाट व व्यवस्थापन तसेच शाळेतील मूल्य संस्कार वृक्ष संवर्धन वडीलधाऱ्यांचा सन्मान अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. या सर्व बाबींमध्ये हजारो शाळांच्या मूल्यांकनात शारदानगरच्या शाळेने बाजी मारली.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्यासह सर्व विश्वस्त, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समनव्ययक प्रशांत तनपुरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच शाळेने हा नावलौकिक
मिळवल्याची कृतज्ञता मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
शारदाबाई पवार शाळेची वैशिष्ट्ये काय?
शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर फिनलँड व नेदरलँड, इजराइल, कोस्टारीका, बाली (इंडोनेशिया) या देशातील शैक्षणिक संस्थांशी शिक्षक प्रशिक्षणासाठी शैक्षणिक सामंजस्य करार केला. ही शाळा भारतातील ग्राममंगल, नेहरू विज्ञान केंद्र , होमीभाभा विज्ञान केंद्र, अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम या संस्था मार्फत शिक्षक प्रशिक्षण आयोजन करते. मेंदू आधारित शिक्षण पद्धती, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब, त्यासाठी मेकर्स स्पेस लॅब मीडिया लॅब इनोवेशन लॅब अटल लॅब फन सायन्स गॅलरी अशा अनेक नवतंत्रज्ञानाचा वापर येथील विद्यार्थी करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना गुगलद्वारे मोफत अनलिमिटेड स्टोअरेज स्पेस उपलब्ध करून देण्यात आले असून, एका विद्यार्थ्याने नासामधील खडतर प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.