बारामती: सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी अशा नंबरप्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
१ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा नंबरप्लेट लावण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबरप्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट महत्त्वाची आहे. तरी सर्व संबंधित वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
या कामासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एम-एस एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मार्फतच नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबरप्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होऊ शकणार नाही. ही नंबरप्लेट बसविण्याकरिता ३१ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पी-९१, कल्याणीनगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे संपर्क करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.