बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या कॉलेजमध्ये जात ‘मिकी माउस कशी आहेस, तू मला आवडतेस’ असं म्हणून अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश नानासो पवार (रा. वाणेवाडी, ता. बारामती), तुषार सुरेश गुलदगड (रा. पळशी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत १७ वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी एका कॉलेजच्या इमारतीतून जात असताना पवार याने तिला ‘मिकी माउस कशी आहेस, तू मला आवडतेस’ असे म्हणून अश्लील हावभाव करून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पवार हा सुमारे एक वर्षापासून, तर गुलदगड हा मागील सहा महिन्यांपासून या मुलीचा पाठलाग करून अश्लील इशारे, अश्लील टोमणे मारून वारंवार त्रास देत होता.
त्याला कंटाळून मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीने एसटी बसमधून प्रवास करणे बंद केले होते. या दोघांच्या भीतीमुळे ती महाविद्यालयाच्या एका शिक्षकासोबत त्यांच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात होती. आरोपींनी त्यानंतर कॉलेजमध्ये येऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे मुलीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. तिने कॉलेजमधील प्रकार प्राचार्य व शिक्षकांना सांगितला. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.