पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धावपळ सगळीकडे सुरु आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे (Baramati Constituency) लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे.
या दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवणारा प्रकार घडला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस बजावली आहे. यामध्ये खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगितले आहे.
महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi) यांनी नोटीस बजावली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे.
बारामती मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली. त्यानुसार सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे १.३ लाख आणि ९.१० लाख रुपये खर्चाची तफावत आढळली. ही तफावत उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली. याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांत खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे.