पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वी मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरुन मुलीच्या वडिल आणि भावांसह तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून एका १७ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. गणेश वाघु धांडे (वय-१७, रा. गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत त्याचे वडिल वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वाघोली परिसरातील गोरे वस्तीतील पेटकर यांचे घरासमोर २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मुलीशी बोलत असल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिल आणि भावांसह तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून गणेश चा खून केला. गणेश हा इतर मित्रासोबत मोटारसायकलवरुन गोरे वस्ती येथील घरी येत होता.
गणेश हा आरोपींच्या मुलीसोबत पूर्वी बोलत होता, याचा राग मनात धरुन तिघांनी गणेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड व दगड डोक्यात मारुन गणेश याचा खुन केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत.