मंचर(पुणे) : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आठव्यांदा विजय मिळविला. त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स गावोगावी लागले आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी लावलेल्या ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. या फ्लेक्सवर ‘साहेब… गावनेता बदला’ असा मजकूर छापण्यात आला आहे.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात सरळ लढत झाली. त्यामध्ये वळसे पाटील यांनी निसटता विजय मिळविला. वळसे पाटील हे केवळ १ हजार ५२३ मतांनी निवडून आले.
वळसे पाटील यांचे मताधिक्य का घटले? याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यातच पारगाव येथे दिलीप वळसे पाटील यांच्या अभिनंदनाचे अनेक फ्लेक्स लागले आहेत. त्यामध्ये एक फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे. यावर वळसे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्याखाली ‘साहेब… उभा आंबेगाव-शिरूर पाहतोय आशेने, आता बदल घडवा गतीने’ आणि त्यानंतर त्याखाली ‘साहेब… गावनेता बदला… साहेब नेता बदला’ असा मजकूर आहे. या मजकुराची चर्चा होत आहे.