पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचा इशारा दिला. त्यानुसार मनसे पदाधिकाऱ्यांनी विविध बँकांच्या भेटी घेऊन मराठीची भाषेचा वापर करण्याबद्दल कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. मराठीचा आग्रह धरताना होणाऱ्या आक्रमक मनसैनिकांमुळे बँकेतील कर्मचारी धास्तावले आहेत. याप्रकरणी आता बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रात त्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी देखील केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनच्यां अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेचे कर्मचारी विविध भाषिक पार्श्वभूमीतून आलेले असतात. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने प्रत्येकाने स्थानिक भाषा शिकावी अशी अपेक्षा करणे अव्यवहार्य आहे.तसेच काही असामाजिक घटक बँक अधिकाऱ्यांना धमकावणे आणि मारहाण करणे यासारख्या कृत्यांमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही अशा गुन्हेगारी कृत्याचा निषेध करतो, ज्यामुळे बँकांचे दैनंदिन कामकाज आणि ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.तसेच बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्रातून केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरले जाते का नाही हे चेक करा,प्रत्येक आस्थापनेत ही बाब तपासून पहा असे आदेश आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बँकांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना इशारा दिला. त्यांच्या या आक्रमक पवित्रामुळे कर्मचारीही आता धास्तावले आहेत.