पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत बांगलादेशी पती-पत्नीला पिंपरी-चिंचवडमधून अटक केली आहे. दोघेही गेल्या आठ दिवसांपासून आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलमध्ये कामगार बनून काम करत होते. टिंकू चौधरी आणि खादिजा खातून अशी दोघांची नाव आहेत. दोघांकडे बनवट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आढळून आले आहे. दोघांना चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द असलेल्या आळंदी फाटा येथे हॉटेलमध्ये कामगार बनून बांगलादेशी टिंकू चौधरी आणि खादिजा खातून वास्तव्य करत होते. ते गेल्या आठ दिवसांपूर्वीच त्या हॉटेलमध्ये आले होते. त्याआधी ते हैदराबादमध्ये एक ते दोन वर्षांपासून राहत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. दोघांकडे वोटर आयडी आणि आधार कार्ड आढळून आलं आहे. पोलिसांच्या तपासात ते बनावट असल्याचे समोर आले आहे.
आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलवर दोन बांगलादेशी पती-पत्नी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खात्री करून दोघांकडे चौकशी केली. चौकशीमध्ये ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५), सह परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४ (A)(B), १४ (C) पार पत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१)(सी) व पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३(अ) या कलमानव्ये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.