अमरावती : राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करीत दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत असलेले राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख बच्चू कडू यांनी तडकाफडकी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्य सरकार दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. दिव्यांगांसाठी आपण आंदोलन करणार असून, पदावर राहून आंदोलन करता येत नसल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्मितीची घोषणा केली होती. दरम्यान बच्चू कडू यांची या विभागाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने सुरक्षा देखील देण्यात आली आहे. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कडू यांनी दिव्यांगांसाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या, मात्र, राज्य शासनाकडून त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही आणि भविष्यात ती पूर्ण होण्याची शक्यताही नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. या पदावर राहून आपण दिव्यांगांना न्याय देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्यालाच आंदोलन करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच आपल्याला देण्यात आलेली सरकारी सुरक्षाही काढून टाकण्यात यावी, अशी मागणी करून त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेविषयी संताप व्यक्त केला आहे.