वाघोली : पुण्यातील वाघोली परिसरातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या चिमुकल्यांना अर्ध्या भाकरीचा घास मिळावा, यासाठी पवार कुटुंब विदर्भातून वाघोली येथील केसनंद फाट्यावर रविवारी (दि. २२) रात्री पोहचले. पोटात भुकेची आग, अंगावर मळके कपडे, अंगावर आभाळाचे पांघरुण, कडाक्याच्या थंडीत ते आपल्या चिमुकल्यांना आश्रय देण्यासाठी केसनंद फाट्यावरील पदपथावर झोपले.
दुसऱ्या दिवशी काहीतरी काम मिळाल्यानंतर चिमुकल्यांना अर्ध्या भाकरीचा घास मिळेल, हे स्वप्न उराशी बाळगून ते निर्धास्त झोपले. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. रविवारची रात्र वैऱ्याची ठरली अन् एकच्या सुमारास एका मद्यधुंद डंपरचालकाने दोन चिमुकल्यांसह अन्य सहा जणांना डंपरने चिरडले. यात दोन चिमुकल्यांचा बळी गेला. रांगण्याच्या वयातच त्यांची पावले थांबली आहेत.
आपल्यासमोर रोज बागडणारी चिमुकली गेल्याने गंभीर जखमी झालेल्या आईसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी जरी मदत जाहीर केली असली, तरी दोन चिमुकल्यांचा व एका तरुणाचा जीव पुन्हा येणे शक्य नाही, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जानकीची प्रकृती गंभीर
वाघोलीतील अपघातातील जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल जानकी पवार (वय १९) या तरुणीच्या श्वासपटलावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिची प्रकृती अद्याप गंभीर असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इतर पाच जखमींची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात जानकी पवार हिच्या पोटावरून डंपरचे चाक गेल्याने पोटातील आतडी पोटाच्या वरील पोकळीत फुफ्फुसाच्या बाजूच्या भागात शिरली होती. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, तसेच श्वासपटलही फाटले होते. तिच्यावर ससूनमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.