उरुळी कांचन, (पुणे): देशातील अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी युवकांची जागृती आणि सहभाग अत्यंत गरजेचा आहे. युवकांची जागृती आणि सहभाग उरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन राबवित असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आणि समाजकार्यात दिसून येतो. ही बाब अतिशय आदर्श घेण्यासारखी व उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाटक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले आहे.
संतोष चौधरी यांच्या नेतृत्वातील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचा 10 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. 06) रक्तदान शिबीराचे आयोजन बी.जी. शिर्के प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काळकर बोलत होते.
उरुळी कांचनच्या इतिहासात पहिल्यांदाच 993 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के.डी. कांचन तर अमृता क्षीरसागर व रेशमा शेख (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या रक्तदान शिबिरात उरुळी कांचनच्या इतिहासात प्रथमच 993 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात 977 पुरुष व 16 महिलांचा समावेश होता. ससून रक्तपेढी आणि तर्पण रक्तपेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, नवीन वर्षाची ड्रिम्स दिनदर्शिका आणि भेट वस्तु म्हणून देण्यात आल्या. तसेच यावेळी ड्रिम्स दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
सामाजिक,शैक्षणिक,सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…
या शिबिराला देविदास भन्साळी, महादेव कांचन, राजाराम कांचन, संभाजी कांचन, राजेंद्र टिळेकर, सरपंच अमित कांचन, बजरंग म्हस्के, माजी सरपंच सुदर्शन चौधरी, संतोष ह. कांचन, भाऊसाहेब कांचन, यशवंतचे संचालक संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, जयप्रकाश बेंद्रे, डॉ. शिवाजी बोराडे, अशोक मोरे, सुनील जगताप, शांताराम चौधरी, अलंकार कांचन, सोमनाथ शेलार यांचेसह उरुळी कांचनसह परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून, रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी आणि स्वयंसेवकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप गेल्या 10 वर्षांपासून उरुळी कांचन व परिसरात पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी ढावारे यांनी सूत्रसंचालन ऋषिकेश भालेराव यांनी तर अरविंद चांदगुडे यांनी आभार मानले.