सध्या पुरुषांसोबतच महिलादेखील सर्रासपणे धूम्रपान करत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये मुली आणि महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. ही एक गंभीर समस्या बनत आहे. पण, जेव्हा महिला गर्भवती असते तेव्हा तिने धूम्रपान करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. नाहीतर गंबीर परिणाम भोगावे लागू शकतात.
गर्भवती महिलांसाठी धूम्रपान करणे केवळ त्यांच्या स्वत:च्या आरोग्यासाठीच धोकादायक नाही, तर त्यांच्या न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जेव्हा एखादी महिला गरोदर असते आणि ती धूम्रपान करते तेव्हा तिच्या शरीरावरच नाही तर तिच्या पोटातील बाळावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. या धूम्रपानामुळे मुलाच्या संसर्गाचा धोका वाढतो, त्याचे नाजूक अवयव खराब होऊ शकतात आणि काहीवेळा त्याचे अवयव नीट, पूर्ण वाढ झालेले असे तयार होत नाहीत.
गर्भवती महिलांनी धूम्रपान केल्याने बाळाच्या फुफ्फुसावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलाच्या फुफ्फुसांची वाढ योग्यरित्या होत नाही, ज्यामुळे नंतर श्वसनाचा त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, गर्भवती महिलेच्या शरीरातील रक्ताभिसरण देखील प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे बाळाला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.
धूम्रपान तातडीने सोडावे
जर एखाद्या महिलेने गर्भवती होण्यापूर्वी धूम्रपान केले तर ते ताबडतोब सोडले पाहिजे. याशिवाय गरोदरपणात महिलेने तिच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून तिचे आणि मुलाचे आरोग्य चांगले राहील. पोषक आहारामुळे बाळाच्या विकासातच मदत होत नाही तर आईच्या शरीराची पुनर्प्राप्ती होण्यासही मदत होते.