युनूस तांबोळी/पुणे : लग्न, यात्रा, जत्रा असो वा सणसमारंभ वाद्याच्या निनादाने कार्यक्रमाला उत्साह भरणारे वाद्यकलाकार ही गावोगावी दिसणारी वादकांची लोककलेची संस्कृती आहे. ताशा, संबळ, डफ, ढोलकी यांना सुरात आणणारी सनई सुरू झाली की ऐकणाऱ्यांनी मान डोलवत या वाद्यकलाकारांवर बक्षीसांची खैरात करावी.
जुन्या नव्या गितांवर वाद्यकाम करत चाहत्यांना आपलेसे करणारे जुने कलाकार काळाच्या पडद्याआड जात असले तरी शिरूर तालुक्यातील निर्वी येथील ताशावादक सिराजभाई याकुबभाई मण्यार यांनी ही वादनाची लोककला जतन केली आहे. आजही ग्रामीण भागात लग्नसराईत त्यांच्या ताशावादनाने त्यांचे चाहते मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत.
पुणे, अहमदनगर जिल्ह्यात वाद्य कलाकारांचा ताफा पहावयास मिळतो. ग्रामीण भागात लग्नसमारंभामध्ये असे वाद्यकाम करणारे कलाकारांनी वाद्यकाम करत ही लोककला जतन केली आहे. जुन्या काळी लग्न समारंभ तीन दिवसापेक्षा अधिक काळ चालत असे. त्यावेळी मनोरंजनाची साधने देखील कमी होती. त्यामुळे वादकांना अधिक मागणी होती.
लग्नात वर पक्षा कडे प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरवाती पासून या वाद्यकलाकारांची हजेरी महत्वाची मानली जात होती. त्याकाळात या कलाकारांना कमी मानधन मिळत असले तरी होणारा सन्मान महत्वाचा मानला जायचा. त्या काळात या वादनासाठी सुर, चाल, ताल, बोली या अंगगुणांना अधिक महत्व दिले जायचे. त्यातून वाद्यकलाकारांची स्पर्धा होत असे.
यात्रा, जत्रांच्या कार्यक्रमात वादनाची हारजीत ठरायची. त्यातून चांदीचे कडे, मानाचा फेटा अशा प्रकारची बक्षिसांची खैरात होत होती. वडील याकुबभाई मण्यार हे जुन्या पिढीतील ताशावादक आहेत. त्यांनी त्यांना ताशावादनाचे धडे दिले. लहानपणापासून वडीलांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ताशा वादनाची कला अवगत केली. मण्यार असल्याने पिढीजात बांगड्यांचा व्यवसाय असून त्यांनी ताशावादनामध्ये अधिक रस घेतला.
नवबा, चारचोपी, आठचोपी, सवारी, बाराचोपी, मंडप के घर, डबल सवारी अशा विविध प्रकारच्या जुन्या चाली त्यांनी अवगत केल्या. दरोडी ( ता. पारनेर ) येथील शेख बाऊद्दिन चिश्ती दर्गाच्या ऊरूसमध्ये ताशावादकांच्या जुगलबंदीमध्ये हजेरी लावून ते आपली कला सादर करत असतात. या कलेतून त्यांनी त्यांचा चाहता वर्ग तयार केला आहे. ताशा बरोबर ते ढोल देखील तेवढ्याच नादमय पद्धतीने वाजवतात. ताशाचा ताल धरताना सनई, सुर, संबळ, डफ यांची त्यांना मोठी कसरत करावी लागते. हे कला संच पथक गण, गवळण, पोवाडा, कव्वाली, जुनी व नवीन मराठी हिंदी गिते तेवढ्याच ताकदीने सादर करतात.
पुणे येथील भिमथडी जत्रेत त्यांनी ही कला सादर करून चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे. या कलेला सन्मान देऊन भिमथडी जत्रेचे आयोजक सुनेत्रा पवार यांची कौतुकाची शाब्बासकी थाप मिळवली आहे. बालेशा सनई ताफ्याचे संस्थापक म्हणून सोशल मिडिया इंस्टाग्रामवर ज्यांचे असंख्य चाहते फॉलोवर आहेत.
नुकतेच साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील यशस्वी युवा उद्योजक व युवा उद्योजिका क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्यावेळी सिराजभाई मण्यार यांना देखील ताशावादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भाऊ शकिलभाई मण्यार हे देखील ताशा वादनामध्ये निपुण असून त्यांचा देखील चांगलाच नावलौकीक आहे.
जुन्या पद्धतीतील ताशा वादन तसेच कलाकार देखील काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यामुळे ताशावादनाची कला नव्या पिढीने जतन केली पाहिजे. त्यासाठी शासनाने देखील प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कला जोपासल्यावर ती सादर करून लग्न, समारंभामधून तरूणांना अर्थाजन होऊ शकते. असे सिराजभाई मण्यार यांनी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना सांगितले.