पुणे : पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेली सुमारे ११०० वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून वाहनांची किंमत निश्चित करून ही वाहने मोडीत काढण्यासाठी लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेने शहरातील बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. अतिक्रमण विभागाने पहिल्या टप्प्यात केलेल्या कारवाईत १०० पेक्षा अधिक वाहने जप्त केली होती. त्यातील काही वाहने नागरिकांनी परत नेली.
मात्र, उर्वरित वाहने घेऊन जाण्यासाठी नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपली वाहने कायद्यानुसार वेळेत परत न नेल्यास या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले होते. तरीही सुमारे ११०० वाहने अतिक्रमण विभागाच्या ताब्यात आहेत. ही वाहने मोडीत काढण्यासाठी त्यांची किंमत निश्चित करण्यात येत आहे.
रस्त्यावरील बेवारस वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. बेवारस आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी वाहने उभी असल्याने धूळ साचून कचऱ्यामुळे ती जागा घाण होते. पावसाळ्यात अशा वाहनांमध्ये पाणी साचून डासांच्या अळ्यांना निमंत्रण मिळते.
वर्षानुवर्षे बेवारस पद्धतीने उभी असलेली वाहने साथीच्या आजारांनाही कारणीभूत ठरते. अनेक ठिकाणी त्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्याचे कारवाई महापालिकेकडून सुरू आहे.
महापालिकेने जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव करून ते भंगारात टाकण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली बंद वाहने रस्त्यांवरून तत्काळ दुसरीकडे हलवावीत. महापालिकेकडून या वाहनांवरही कारवाई करण्यात येत आहे.